'काँग्रेस-राष्ट्रवादी अन् शिवसेनेचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलितांवर अत्याचार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:00 PM2020-09-02T18:00:46+5:302020-09-02T18:01:44+5:30
आठवलेंनी विविध विषयांवर आणि दलितांवरील अत्याचारावर आपली भूमिका मांडली. ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही
मुंबई - केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी 'दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल बोलताना भाजपाला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत', असं मत रामदास आठवले केलं आहे. 'दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल भाजप सरकारला दोष देणं योग्य नाही. यासाठी समाजाची धारणा दोषी आहे', असेही आठवलेंनी स्पष्ट केले. काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही दलितांच्या अत्याचारात वाढ झाल्याचे 'नवभारत टाईम्स'च्या एका मुलाखतीत बोलताना आठवलेंनी म्हटले.
आठवलेंनी विविध विषयांवर आणि दलितांवरील अत्याचारावर आपली भूमिका मांडली. ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही. भाजपला सगळ्यांनी मतं दिलीत. तो दलित पक्षही आहे, मागासवर्गीयांचा आणि अल्पसंख्यांकाचाही आहे' असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. याच मुलाखतीत बोलताना दलित अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचं रामदास आठवले यांनी नाकारलं नसलं तरी यामागे सामाजिक भेदभाव कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आजचा दलित चांगले कपडे परिधान करू लागलाय. तो आज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. याच रागातून त्यांच्याविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दलित अत्याचाराच्या घटनांत नक्कीच वाढ झालीय पण ती केवळ भाजपशासित राज्यांत नाही तर काँग्रेसचं सरकार असलेल्या राजस्थानात आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार असलेल्या महाराष्ट्रातही या घटना वाढल्यात. कायदा व सुव्यवस्था हा राज्य सरकारांचा विषय आहे. सोबतच समाजालाही बदलावं लागेल. भाजपमुळे हे होतंय असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत आठवलेंनी भाजपाची पाठराखण केली आहे.