नवी दिल्ली - देशातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यामुळे सातव्या टप्प्यातील निवडणूक गाजली आहे. प. बंगालसह उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ माजली आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात मंगळवारी प्रचाराला गेलेल्या आदिती सिंह यांच्यावर हल्ला झाला आहे. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला आहे.
आदिती सिंह यांनी सांगितले की, लखनऊ त्या निघाल्या असताना जवळपास 40 ते 50 लोकं त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. आदिती सिंह गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या आहेत. आदिती सिंह यांची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी भेट घेण्याची शक्यता आहे.
देशातील प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. त्याठिकाणी स्थानिक राजकारण तापू लागले आहे. मंगळवारी जिल्हा पंचायत अध्यक्ष अवधेश सिंह यांच्याविरोधात अविश्वास ठराव समंत होणार होता. मात्र त्याआधीच काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला. अवधेश सिंह हे रायबरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असलेले दिनेशप्रताप सिंह यांचे बंधू आहेत. आदितीने अवधेश सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप लावला आहे.
अविश्वास ठरावावेळी मतदान करण्याआधी आदिती सिंह लखनऊवरुन रायबरेली येथे जात होत्या. तेव्हा अनेक गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. रायबरेलीनजीक बछरावा टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर फायरिंग करण्यात आली. त्यामध्ये आदिती सिंह यांच्या गाडीचा वेग वाढविण्यात आला आणि त्यामुळे गाडी पलटी झाली. यात आदिती सिंह जखमी झाल्या.
आदिती सिंह कोण आहेत?रायबरेलीच्या राजकारणात वर्चस्वाची लढाई नाही. रायबरेली येथील स्थानिक राजकारणावर दबदबा असणारे अखिलेश सिंह सध्या आजारामुळे कार्यरत नाही. मात्र त्यांचा वारसा चालवण्याचं काम आदिती सिंह करत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतांनी आदिती सिंह निवडून आल्या.