मुजफ्फराबाद : आपल्या सैन्यासह भारतावर थेट हल्ला करा, असे आवाहन पाकव्याप्त काश्मिरातील पंतप्रधान रजा फारुक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केले आहे. रजा फारुक हैदर हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. एकीकडे जगात कोरोनाचा प्रसार वाढला असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रजा फारुक हैदर हे नियंत्रण रेषेजवळील गावात आले होते. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केले. पाकिस्तान सध्या नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. भारताकडून प्रत्युत्तरात होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी या गावात बंकर बनविले आहेत. भारत आता पीओकेमधील हवामानाची माहिती देत आहे. आम्हीही दिल्लीतील हवामानाचे अपडेट देणे सुरू करावे. सध्याच्या रणनीतीनुसार, काश्मीरला आगामी ७०० वर्षांत स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.ठोस कारवाई करामीडियाशी बोलताना हैदर म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी आता ठोस कारवाई करण्याची गरज आहे. केवळ वक्तव्ये करून चालणार नाही. त्यापुढे जाऊन आपल्या सैन्याला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा. आमचे हे कर्तव्य आहे की, आमच्या बहीण-भावांना सुरक्षित ठेवावे.
भारतावर थेट हल्ला करा, पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:37 AM