नवी दिल्ली : देशभरात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली असतानाच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने भारतात मोठे हल्ले करण्याचा कट रचला असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.या घातपातासाठी आयएसआयने लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहंमद या तीन दहशतवादी संघटनांना हाताशी धरले आहे. हा कट अमलात आणण्यासाठी आयएसआयने अलीकडेच या तीनही संघटनांच्या म्होरक्यांची एक बैठक बोलावली होती. मिळालेल्या माहितीनुसार भारतात नजीकच्या काळात घडविण्यात येणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी ३० दहशतवाद्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पेशावर येथून नियंत्रण रेषेजवळ सोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळावर आयएसआयने लष्कर, हिज्बुल आणि जैशच्या म्होरक्यांना काही सूचना दिल्यानंतर या ३० दहशतवाद्यांना कटाची सविस्तर माहिती दिल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. या तीनही दहशतवादी गटांना हल्ल्यासाठी लागणारी सामग्री, पैसा, दळणवळण आणि इतर सर्व मदत आयएसआय करीत आहे. शौकत खान नामक आयएसआयच्या अधिकाऱ्याने ही बैठक घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)३० दहशतवाद्यांना हल्ल्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून मार्गात बर्फ जमा होण्यापूर्वी भारतात घुसण्याच्या सूचनाही आयएसआयने त्यांना दिल्या आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर सरकारने जम्मू-काश्मीरसह देशभरातील सुरक्षा यंत्रणेस सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
भारतात हल्ल्याचा आयएसआयचा कट
By admin | Published: November 28, 2015 12:22 AM