नवी दिल्ली : मोदी सरकारने चिथावणी दिलेल्या काही गुंडांनी जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला केला असा आरोप काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जेएनयूत झालेल्या हल्ल्याचा देशभरातील बहुतांश राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे.प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये पोलीस किंवा मोदी सरकारने चिथावणी दिलेले गुंड जात आहेत. देशातील युवकांना खिशाला परवडेल अशा खर्चात शिक्षण दिले पाहिजे. त्यांना नोकरी व उत्तम भवितव्य असणे गरजेचे आहे. लोकशाहीतील सारे हक्क या युवकांना बजावता आले पाहिजेत. मात्र मोदी सरकारच्या काळात देशातील युवकांची विलक्षण घुसमट होत आहे असेही सोनिया गांधी म्हणाल्या. हल्ल्याचा समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या दोघांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी मायावती यांनी केली. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर पाशवी पद्धतीने हल्ला करण्यात आला असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे तर या हल्ल्याच्या प्रकारामुळे आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठातील गंभीर स्थितीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक घेतली. आणिबाणीच्या काळात होती तशीच परिस्थिती सध्या असल्याचे जेएनयू हल्ल्यामुळे सिद्ध झाले आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.केंद्र सरकारने भाजपचे गुंड जेएनयूमध्ये पाठविले व पोलिस प्रशासनाला निष्क्रिय ठेवण्यात आले. हा फॅसिस्ट सर्जिकल स्ट्राईकच होता असेही त्या म्हणाल्या.>बॉलिवूडने केला धिक्कारजेएनयूतील हल्ल्याचा राजकुमार राव, क्रिती सॅनन, अनुराग कश्यप, सोनम कपूर आहुजा,ट्विंकल खन्ना आदी अभिनेते व चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी निषेध केला आहे. हा अतिशय धक्कादायक व भेकड हल्ला होता असे सोनम कपूर यांनी म्हटले आहे. जेएनयूमध्ये जे घडले ते अतिशय लाजिरवाणे, धक्कादायक होते. या प्रकरणातील आरोपींना अतिशय कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी अभिनेता राजकुमार राव यांनी केली आहे.अभिनेत्री स्वरा भास्कर, शबाना आझमी, मोहम्मद झिशान अयूब, तापसी पन्नू, अपर्णा सेन, रेणुका शहाणे, लेखक गौरव सोळंकी, अनुभव सिन्हा, हंसल मेहता या नामवंतांनीही निषेध नोंदविला.
केंद्राच्या चिथावणीमुळेच गुंडांचा ‘जेएनयू’त हल्ला, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:22 AM