महुआ मोइत्रांचा हल्ला; स्वपन दासगुप्ता घायाळ, विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:50 AM2021-03-17T03:50:41+5:302021-03-17T06:58:13+5:30
श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू शकतात.
कोलकाता : आक्रमक भाषणांसाठी देशभर चर्चेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सोमवारी रात्री राज्यसभेतील राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यत्वाबाबतची दुर्लक्षित तरतूद समोर आणून, राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य स्वपन दासगुप्ता यांच्यावर ट्वीटद्वारे हल्ला चढविला. त्यामुळे तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे अर्ज भरण्याआधी त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.
मात्र श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू शकतात. त्यानंतर त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले तर राज्यसभेचे सदस्य म्हणून ते अपात्र ठरतात. एरव्ही कोणाच्याही लक्षात नसलेली ही तरतूद श्रीमती महुआ मोइत्रा यांनी सोमवारी रात्री ट्विटद्वारे समोर आणली.
राज्यसभेचा राजीनामा न देता विधानसभेसाठी अर्ज दाखल केला तर तो अवैध ठरणार नाही, पण राज्यसभेतून ते अपात्र ठरतील, असा परिणामही त्यांनी सांगितला. परिणामी, मंगळवारी सकाळी घाईघाईने दासगुप्ता यांनी राजीनामा सादर केला. तो उद्याच मंजूर करावा, जेणेकरून विधानसभेसाठी अर्ज भरता येईल, अशी विनंती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना केली.
भाजपने केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह ज्या चार खासदारांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यात राष्ट्रपती नामनिर्देशित स्वपन दासगुप्ता, तसेच लॉकेट चटर्जी व निशित प्रामाणिक यांचा समावेश आहे.