नवी दिल्ली : नवी दिल्लीतील आफ्रिकन नागरिकांवरील हल्ल्यांच्या संदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले. तथापि आफ्रिकन नागरिकांवरील हे हल्ले ‘अगदी किरकोळ भांडणाचा परिणाम’ असल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी मीडियावर टीका केली आहे. दरम्यान, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आफ्रिकन नागरिकांना पुरेशी सुरक्षा देण्याचे आश्वासन आफ्रिकन नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.स्वराज यांनी रविवारी राजनाथसिंग व नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन आफ्रिकन नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्वराज व राजनाथसिंग हे दोन मंत्री या मुद्द्यावर गंभीर असले तरी व्ही. के. सिंग यांनी हे किरकोळ भांडण असल्याचे म्हटले आहे. ‘आफ्रिकन नागरिकांसोबतच्या या किरकोळ भांडणाला हल्ला झाल्याचे सांगून मीडिया उगाच त्याला अवास्तव महत्त्व देत आहे,’ असे सिंग यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
हल्ला हे तर किरकोळ भांडण
By admin | Published: May 31, 2016 5:54 AM