नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, कन्हैय्या कुमारने भाषण करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, देशातील सर्वात जुना पक्ष असल्याने आणि महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कन्हैय्याने म्हटले होते. तसेच, भारतीय संविधान आणि आयडिया ऑफ इंडियाचाही त्यांनी अनेकदा उल्लेख केला. राहुल गांधींच्य केरळमधील भाषणातही आज तोच सूर पाहायला मिळाला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधीं भारत म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं.
जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील, असे राहुल गांधींनी म्हटले.
ते म्हणतील भारत हा प्रदेश आहे, पण भारत हा विविध लोकांचं नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचं नात आहे, हिंदू-मुस्ली-शीख धर्मीयांचा आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचं नातं आहे. आपल्यातलं हेच नातं फोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत, ही मला समस्या वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, ते भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र, लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो, असेही राहुल गांधींनी म्हटले.
काय म्हणाले होते कन्हैय्या कुमार
कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते.