- डिप्पी वांकाणीमुंबई : ८० च्या दशकात पंजाबमधील दहशतवाद निपटून काढणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या मते पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात सोमवारी झालेला दहशतवादी हल्ला खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी केला असण्याची शक्यता नाही. कारण पंजाबमध्ये सोमवारी झालेल्या या हल्ल्यापेक्षा खलिस्तानवाद्यांची मोडस आॅपरेंडी पूर्णपणे वेगळी होती. रिबेरो यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार खलिस्तानवादी अतिरेकी ८० च्या दशकात अचानक जमावावर वा वाहनावर गोळीबार करत असत आणि तिथून निघून जात असत. पण सोमवारी दिनानगर येथे झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे हल्ला केला असून त्यांची या हल्ल्यात मरण्याचीही तयारी आहे. त्यामुळेच हा हल्ला पाकिस्तानने केला असण्याची दाट शक्यता आहे. संशयाची सुई पाकिस्तानवर रोखलेली आहे, असे रिबेरो यांनी म्हटले आहे. पंजाबमधून खलिस्तानी चळवळीचा पूर्ण बीमोड झाला होता. पंजाबी लोकांनीही त्याची काळजी करणे सोडून दिले होते; पण आॅपरेशन ब्लू स्टारच्या स्मृतिदिनी जम्मूत भिंद्रनवालांचे फोटो नाचवले गेले, ते पाहून मला धक्काच बसला असे रिबेरो म्हणाले. इतक्या वर्षांनंतर पुन्हा भिंद्रनवालेंचे फोटो बाळगले जात असतील तर खलिस्तानवादीही या हल्ल्यामागे असू शकतील. या हल्ल्यामागे कोण आहे, हे पोलिसच सांगू शकतील, असे ते म्हणाले.
‘हल्ला खलिस्तानवाद्यांनी केलेला नाही’
By admin | Published: July 28, 2015 3:31 AM