जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. या सुरुवातीच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील चतरगला भागात ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यानंतर याठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, डोडा जिल्ह्याच्या चतरगला भागात दहशतवाद्यांनी ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. सध्या ठिकाणी चकमक सुरू आहे. डोडा येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले असून, दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (IB) एका गावात काल संध्याकाळी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अशावेळी हा हल्ला झाला आहे. कठुआ जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. तसेच, कठुआ कारवाईत सुरक्षा दलांनी एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नुकतेच, रविवारी पोनी परिसरातील तेरायथ गावाजवळील शिव खोडी मंदिरापासून कटरा येथे जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत.
'या' वृत्तांचे खंडन दरम्यान, एडीजीपी जम्मू यांनी ट्विट केले आहे की, "आमच्या लक्षात आले आहे की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या खोट्या बातम्यांमध्ये दावा केला जातो की, एका ठिकाणाहून तीन नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत आणि दहशतवाद्यांनी काही गावकऱ्यांना ओलीस ठेवले आहे. आम्ही जनतेला शांत राहण्याचे आणि अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतो. तसेच, यावर नियंत्रण न ठेवल्यास या चुकीच्या माहितीमुळे उद्या जम्मू शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.