नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शुक्रवारी(दि.25) पदयात्रेदरम्यान हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवालांवर हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आप नेते मनीष सिसोदिया म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे. भाजपने आपल्या गुंडांच्या मार्फत हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपवर राहील.
भाजपला केजरीवालांना मारायचे आहेः मुख्यमंत्री आतिशी
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, आज अरविंद केजरीवाल यांच्या पदयात्रेत भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. भाजपचे काही कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना पुष्पहार घालण्यासाठी आले आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि प्रत्येक वेळी या हल्ल्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. भाजपला केजरीवालांना मारायचे आहे, असा आरोप आतिशी यांनी केला.
विकासपुरी पदयात्रेदरम्यान हल्ला आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, विकासपुरी पदयात्रेदरम्यान भाजपशी संबंधित लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ईडी, सीबीआय आणि तुरुंगात जाऊनही काम झाले नाही, त्यामुळे आता भाजपचे लोक अरविंद केजरीवालांवर हल्ला करत आहेत. केजरीवाल यांना काही झाले तर त्याला भाजप थेट जबाबदार असेल. अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात असताना त्यांचे इन्सुलिन बंद करण्यात आले होते, त्यांची किडनी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आता असा हल्ला भ्याडपणाचा आहे.