Attack on Bangladesh High Commission : त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल भारताने तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बांग्लादेशात इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला होता.
त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे विश्व हिंदू परिषदेचा (विहिंप) भाग असलेल्या हिंदू संघर्ष समितीच्या बॅनरखाली हजारो लोकांच्या जमावाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध आणि हिंदूंवरील हल्ले थांबवण्याच्या मागणीसाठी रॅलीये आयोजन केले होते. यावेळी काही लोकांनी बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तावर हल्ला आणि आत घुसण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (2 डिसेंबर 2024) म्हटले की, आगरतळा येथील बांग्लादेश सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात झालेली घुसखोरी "अत्यंत खेदजनक" आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदनपरराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले की, "कोणत्याही परिस्थितीत राजनैतिक आणि वाणिज्य दूतावासाच्या मालमत्तेला लक्ष्य केले जाऊ नये. बांग्लादेश उच्चायुक्तालय आणि त्याच्या उप/सहाय्यक उच्चायुक्तांच्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे." दरम्यान, त्रिपुरा विहिंपचे सचिव शंकर रॉय म्हणाले की, शेख हसीना सरकार पडल्यापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत आणि हिंदू व्यावसायिकांना लुटले जात आहे. चिन्मय प्रभू यांनाही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला म्हणून तुरुंगात डांबण्यात आले. चिन्मय दास यांच्या सुटकेसाठी भारत सरकराने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.