'मैत्रीच्या प्रत्येक प्रतिकावर हल्ला, आता गप्प राहणे कठीण...'; बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात थरूर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:48 AM2024-08-14T09:48:12+5:302024-08-14T09:48:44+5:30
"बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे.
बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ झाल्यानंतरही हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. तेथे अल्पसंख्यक हिंदूंना लक्ष केले जात आहे. यासंदर्भात आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाष्य केले आहे. "बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर म्हणाले, ज्या देशाचा लोकशाही क्रांती म्हणून गौरव करण्यात आला होता, तेथे अराजक निर्माण झाले आहे. अल्पसंख्यक आणि हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवून हिंसाचार सुरू आहे. हे पाहावे लागणे अत्यंत दुःखद आहे. एएनआय सोबत बोलताना थरूर म्हणाले, "हे अत्यंत दुःखद आहे की, अल्पसंख्यक आणि हिंदू अल्पसंख्यकांना निशाना बनवून हिंसाचार केला जात आहे. आपल्याला भारतात या लोकांसोबत उभे राहायला हवे."
'बांगलादेशातील हिंसाचार नकारात्मक संकेत' -
थरूर म्हणाले, "भारतीय जवानांसमोर पाकिस्तानी सेन्याने केलेल्या आत्मसमर्पणासंदर्भातील प्रतिमा तोडण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक केंद्र नष्ट करण्यात आले आहे, इस्कॉन मंदिरासह अनेक संस्थांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी भारतीय जनतेसाठी अत्यंत नकारात्मक संकेत आहे. अशा प्रकारे समोर येणे बांगलादेशाच्याही हिताचे नाही." एवढेच नाही तर, "तेथे पुन्हा एकदा लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे, यात शंकाच नाही, मात्र, आपण विशेषत: अल्पसंख्यकांच्या विरोधात जात आहात, जे योग्य नाही," असेही थरूर यांनी म्हटेल आहे.
हिंदू समाज आणि बांगलादेशचे सैन्य यांच्यात चकमक -
गेल्या 5 ऑगस्टला वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या भारतात आल्या. यानंतर, बांगलादेश राजकीय अस्थिरतेतून जात आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट 2024) अल्पसंख्यक हिंदू समाजाचे नागरिक आणि बांगलादेशी सैनिक यांच्यात चकमक उडाली. हे हिंदू लोक देशातील हिंसाचारात बेपत्ता झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोस्टर्ससह निषेध करत होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राहत असलेल्या ढाका येथील जमुना स्टेट गेस्ट हाऊसबाहेर हे सर्व हिंदू निदर्शन करत होते.