जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व लष्करी जवानांवर कुपवाडा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यामध्ये तीन लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
पोलिसांनी अधिकाऱ्यांसह १६ लष्करी जवानांवर गुन्हा दाखल केला आहे, जवानांच्या हल्ल्यात पोलिस ठाण्यात प्रभारीसह पाच पोलिस जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस ठाण्यात कथितपणे गोंधळ घालत असलेल्या सैनिकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लष्कराने पोलिसांवर हल्ला केल्या नसल्याचे सांगत ही घटना किरकोळ मतभेदांची असल्याचे म्हटले आहे.
लष्कर अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, पोलीस आणि लष्करातील जवानांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. एका ऑपरेशनवरुन पोलीस कर्मचारी आणि प्रादेशिक लष्कराच्या तुकड्यांमधील किरकोळ मतभेद झाले होते, आता हा प्रश्न सौहार्दपूर्णपणे सोडवला आहे.
ज्या १६ लष्करी जवानांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यात लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात दंगल, खुनाचा प्रयत्न आणि पोलिसांचे अपहरण अशा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी मंगळवारी कुपवाडाच्या बाटपोरा गावात प्रादेशिक सैन्याच्या एका सैनिकाच्या घरावर छापा टाकला होता. पोलिस एफआयआरनुसार, रात्री ९.४० च्या सुमारास सैनिकांनी पोलिस ठाण्यात गेले आणि गोंधळ केला. एफआयआरमध्ये तीन लष्करी अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टेरिटोरियल आर्मीचे १६० सशस्त्र आणि गणवेशधारी सैनिक पोलिस ठाण्यात अनधिकृतपणे घुसले, आणि सैनिकांनी पोलिसांना मारहाण केली.
एफआयआरमध्ये लिहिले आहे की, "यावेळी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलिस कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हे अधिकारी पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले. पोलिस तुकड्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना येताना पाहून लेफ्टनंट कर्नल अंकित सूद, राजू चौहान यांच्या नेतृत्वाखाली १६० प्रादेशिक लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांनी आपली शस्त्रे हलवली आणि जखमी जवान आणि एसएचओ पीएस कुपवाडा इन्स्पेक्टर मोहम्मद इशाक यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. हेड कॉन्स्टेबलचे अपहरण केल्याचाही आरोप सैनिकांवर आहे.