ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १६ - पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असतानाच समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पॅरिसवरील हल्ला हा अमेरिका व रशियाच्या नेतृत्वाखाली सीरिया, इराक, लिबिया, अफगाणिस्तान आदी देशांवर केलेल्या हल्ल्यांची प्रतिक्रिया असल्याची वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खान यांनी अमेरिका, रसिया व एकूणच पाश्चात्य संस्कृतीवर तुफान हल्ला चढवत मध्यपूर्वेतल्या तेलावर हे देश श्रीमंत झाल्याचा जावईशोध लावला तसेच, त्या देशांमधली मुलं उपाशी असताना पाश्चात्य देशात मद्याच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचा दावा केला. मुलांची रोटी जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याचा हात तोडला पाहिजे अशी इस्लामची शिकवण असल्याचंही खान यांनी यावेळी सांगितलं.
खान यांच्या संपूर्ण बोलण्याचा रोख पॅरीसवर झालेला हल्ला ही प्रतिक्रिया असल्याचा आणि तो समर्थनीय मानता येईल असा होता. मात्र, आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे हल्ल्याचे समर्थन केल्याची टीका सुरु होताच माझ्या विधानाचा गैरअर्थ काढल्याची सारवासारव त्यांनी केली आहे.
खान यांनी या भाषणामध्ये पॅरिसमधील हल्ला हा चुकीचाच आहे असे सांगितले पण तेल विहीरींवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका व रशियासारखे देश अरब देशामध्ये नरसंहार घडवत असून तेदेखील चुकीचेच आहे आणि त्याचा आधी सगळ्यांनी निषेध करायला हवा असेही सांगितले. पाश्चिमात्य देशांनी तेलाच्या भूकेपोटी इराक, लिबीया, सीरिया व अफगाणिस्तान या देशांना आधीच उध्वस्त केले आहेत. माचिसची काडी आधी कोणी पेटवली याचा विचार या देशांनी करावा असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करता तेव्हा तुम्हालाही याची प्रतिक्रिया सोसावीच लागते असे त्यांनी म्हटले आहे.