नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्यावर विरोधी गटाच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या रूममध्ये जाऊन बुधवारी रात्री हल्ला केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे.विवेक पांडे, असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो ‘आॅल इंडिया स्टुडंटस् असोसिएशन’चा (एआयएसए) कार्यकर्ता आहे. त्याने सांगितले की, अभाविपच्या सदस्यांनी बुधवारी रात्री माझ्या खोलीत येऊन माझ्यावर हल्ला केला. ‘तू माझ्या विरोधात वसतिगृहाची सुरक्षा यंत्रणा आणि वॉर्डन यांच्याकडे तक्रार का केली’, असे हल्लेखोरांपैकी एक जण मला विचारत होता. अशी कोणतीही तक्रार केलेली नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनी मला अनेक ठोसे मारले. डोक्यावर फटके हाणले. मध्ये पडलेल्या माझ्या मित्रालाही त्यांनी मारहाण केली.एआयएसएचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. साई बालाजी यांनी टिष्ट्वटरवर एक व्हिडिओ सामायिक केला. त्यात पांडे आपल्यावरील हल्ल्याची माहिती देताना दिसतो. अभाविपचा दिल्ली कार्यकारिणी सदस्य सुजित शर्मा याने सांगितले की, आमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. आमच्यावरील आरोप निराधार आहेत.
‘जेएनयू’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यावर रात्री हल्ला, ‘अभाविप’चे कृत्य असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:13 AM