चंडीगढ - हरयाणातील सिरसो येथे भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आटोपून परतणाऱ्या विधानसभा उपाध्यक्ष रणबीर गंगवा यांच्या गाडीवर आंदोलकांनी हल्ला केला. गाडीवर दगडफेक केल्यामुळे गाडीच्या पाठिमागील काचा तुटल्या आहेत. सुदैवाने रणबीर गंगवा आणि त्यांच्या गाडीतील सहकाऱ्यांना दुखापत झाली नाही. तर, दुसरीकडे खासदार सुनिता दुग्गल यांना प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गाडीतून बाहेर नेण्यात आले.
विधानसभा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये दोन्हीकडील 5 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, आंदोलक शेतकऱ्यांनी सिरसा येथील पोलीस ठाणे आणि हिसार रोड महाराणा प्रताप चौक एकत्र येऊन चक्का जाम केला होता. आता, गाडीवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
भाजपातर्फे सीडीएलयु येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये, खासदार सुनिता दुग्गल, उपाध्यक्ष रणबीरसिंग गंगवा, जिल्हाध्यक्ष आदित्य देवीलाल, महासचिव अमन चोपडा व पक्षाचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी या शिबीराच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा अगोदरच केली होती. त्यामुळे, विद्यापीठाच्या विविध गेटवर आंदोलक ग्रुप-ग्रुपने एकत्र आले होते. त्यावेळीही, पोलिसांनी आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर नेतेमंडळी बाहेर पडताच आंदोलकांनी घोषणाबाजी करत उपाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक केली. गंगवा हे संवैधानिक पदावर आहेत, त्यामुळे एका विशिष्ठ पक्षाच्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहणे योग्य नाही, असे म्हणत बैठकीला उपाध्यक्षांच्या उपस्थितीविरोधात शेतकरी आक्रमक झाले होते.
दरम्यान, आंदोलकांनी विरोध हा लोकशाही मार्गाने करायला हवा, तेही आमचे भाऊबंदच आहेत. शेतकरी आहेत, म्हणूनच आपण आहोत. चर्चेतून मार्ग काढायला हवा, असे खासदार सुनिता दुग्गल यांनी म्हटलंय.