ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत देशातील शहीद जवानांसंदर्भात बुधवारी वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सनी अखिलेश यांना धारेवर धरत त्यांच्याविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे.
देशाच्या प्रत्येक भागातील जवान शहीद झाले आहेत, मग गुजरातचा एकही कसा नाही, असा सवाल करत अखिलेश यादव यांनी बुधवारी गुजरातमधील जनतेच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दक्षिण भारतासह प्रत्येक ठिकाणचे जवान शहीद झाले आहेत, गुजरातच्या एखाद्या जवानाला हौतात्म्य आले असेल तर सांगा’, असे वादग्रस्त वक्तव्य अखिलेश यांनी बुधवारी केले.
दरम्यान "अखिलेश यांचे हे विधान निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून केले गेले आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. "अखिलेश यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून करण्यात आले असून ही एक अत्यंत घाणेरडी राजकीय विचारसणी आहे", असे रुपानी म्हणाले आहेत.
#AkhileshInsultsMartyrs
तर दुसरीकडे अखिलेश यांच्या विधानाचा नेटीझन्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर ट्विटरवर #AkhileshInsultsMartyrs असा हॅशटॅग वापरुन युसर्ज अखिलेश यादव यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आहेत.
आरएस शर्मा यांनी लिहिले आहे की, हे आहेत आमचे भावी राजकीय नेते - अखिलेश, केजरीवाल आणि राहुल. यावरुन देशाच्या भविष्याचा अंदाजा लावा.
अखिलेश आता पूर्णतः राहुल गांधी झाले आहेत, असेभोला एचएमपीयांनी ट्विट केले आहे.
Akhilesh Yadav has now become full time Rahul Gandhi. #AkhileshInsultsMartyrs— Bhola HMP (@DilliWalaLaunda) May 10, 2017
राजीव सूद यांनी तर अखिलेश यांच्या विधानावर संताप व्यक्त करत त्यांना प्रश्न विचारला आहे की, "मी विचारू शकतो का ? की तुमच्या कुटुंबात शहीद तर सोडा कुणी सैनिक तरी आहे का?".
#AkhileshInsultsMartyrs May I ask him if he has a soldier from his immediate family serving nation leave alone a Martyr. SHAMEFUL— Rajive Sood (@SoodRajive) May 10, 2017
#AkhileshInsultsMartyrs Shameful politician dividing Martyrs on caste class region and religion.Nation must unite and give it back to him— Rajive Sood (@SoodRajive) May 10, 2017
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्ताच्या सैनिकांनी 1 मे रोजी केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला.
या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या 200 व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले. पाकिस्तानच्या सैन्यानं नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते.
या घटनेवर प्रश्न उपस्थित करत अखिलेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
भाजपा केवळ शहीद, देशभक्ती आणि वंदे मातरम या मुद्यांवर राजकारण करत आहे, असा आरोप यावेळी अखिलेश यांना केला. शिवाय सैनिकांचे शीर कापून नेले जात असताना सरकार काय करत आहे?, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला आहे.