पटना : केंद्रातील भाजप सरकारकडून एससी/एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे उत्तर भारतामध्ये काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला आहे. रस्ते आणि ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. या राज्यात काही ठिकाणी हिंसा झाल्याच्या बातम्या आता पुढे येत आहे. बिहारच्या मधेपुरा येथील खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेता पप्पू यादव यांनाही आज मारहाण झाली आहे.
पप्पू यादव यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांना मारहाण झाल्याचे सांगताना रडू कोसळले. महिला बचाव पदयात्रसाठी आपण मधुबनीमध्ये फिरत होतो. यावेळी आमच्या गाड्यांवर काहींनी हल्ला केला, तसेच कार्यकर्त्यांना त्यांच्या जातीवरून विचारत मारहाण केली. जेव्हा मी विरोध केला तेव्हा माझ्यावरही हल्ला करण्यात आला. सुरक्षा पथक नसते तर त्या लोकांनी ठार मारले असते, असा आरोप त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.
पप्पू यादव यांनी पुढे जिल्याचे पोलीस प्रमुख, महासंचालक आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप केला.