कन्नूर: शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यानंतर भाजप व संघ परिवारातील संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे केरळ अद्याप धुमसत असून, कन्नूर जिल्ह्यात हिंसाचार सुरू आहे. भाजपा विरुद्ध माकप असे त्याचे स्वरूप असून, या प्रकरणी तेथील ३३ जणांना अटक झाली आहे.
भाजपा व संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री कन्नूरमधील माकपचे आमदार ए. एन. शमशेर व पी. शशी यांच्या घरांवर बॉम्ब फेकले. त्यानंतर माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे राज्यसभा सदस्य व्ही. मुरलीधर यांच्या घरावर बॉम्ब फेकला. आतापर्यंत केरळमध्ये सुमारे १८00 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बॉम्बहल्ल्यांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तलास्सेरीचे आ. शमशेर शांतता सभेत भाषण करीत असताना, त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आला. हा भाजपाचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप शमशेर यांनी केला आहे. पी. शशी यांच्या घरावरही रात्री हल्ला झाला. त्यानंतर काही वेळातच इरिट्टी भागात माकपच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते संतापले होते. शशी यांच्यावरही चार जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. (वृत्तसंस्था)माकपचे कार्यकर्तेही आक्रमकच्या प्रकारांनंतर भाजपा खासदार मुरलीधर व तिरुवंगड येथील संघाचे नेते के. चंद्रशेखर तसेच भाजपाचे थलास्सेरी मंडळाचे अध्यक्ष सुमेश अशा तिघांच्या निवासस्थानी हल्ले झाले. हे हल्ले माकपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपा व संघ परिवाराने केला आहे. या तिन्ही नेत्यांना वा त्यांच्या कुटुंबीयांना इजा झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले.