चेन्नई : देशाच्या स्वायत्त संस्थांच्या अधिकारांवर भाजपचे सरकार गदा आणत असून त्यावरील हल्ले कधीही खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेस आणि आघाडीचे पक्ष मिळून याविरोधात उभे राहू असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिला.डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.
डीएमकेचे नेते करुणानिधी हे देखील देशाच्या संस्थांना बळ देत आले आहेत. आज तामिळनाडूमध्ये संस्कृती, राज्यातील संस्थांचा गळा दाबला जात आहे. हे देशातही होत आहे. यामुळे भारतीय नागरिकांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची हाक दिली असून पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे सुतोवाच राहुल यांनी केले.
केंद्र सरकार देशाच्या महत्वाच्या संस्था, सर्वोच्च न्यायालय, आरबीआय, निवडणूक आयोग यांच्या संकल्पनाच धुळीला मिळवत आहे. यामुळे सर्वांनी एकत्र येत भाजपचा पराभव करू, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
नायडू म्हणाले, राजकारण्यांना शह देण्यासाठी ईडी, आयकर विभागाचा गैरवापर सुरु आहे. राफेल विमानांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही काल आपण हेच पाहिले. सर्वोच्च न्यायालयातही चुकीचे अॅफिडेव्हीट करण्याची या सरकारची मजल गेली आहे. गोवा, नागालँड, तामिळनाडू, कर्नाटक, काश्मीरमध्ये राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत.