नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय शिपिंग लेनमधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांनंतर केंद्र सरकार अलर्ट झाली आहे. या घटनांमध्ये आळ घालण्यासाठी भारतीय नौदलाने उत्तर आणि मध्य अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात पाळत वाढवलीये. नौदलाने सांगितले की, नौदल टास्क ग्रुप सागरी सुरक्षा ऑपरेशन्स करण्यासाठी आणि कोणत्याही हल्ल्याच्या वेळी व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे.
विध्वंसक आणि फ्रिगेट्स व्यतिरिक्त नौदलाने मानवरहित हवाई वाहने (UAV) आणि सागरी गस्ती विमाने देखील तैनात केली आहेत. भारतीय किनारपट्टीपासून 400 किमी दूर एमव्ही केम प्लूटो व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर भारतीय नौदलाने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, अरबी समुद्रात ड्रोन हल्ल्याचा सामना करणारे एमव्ही केम प्लूटो व्यापारी जहाज मुंबई किनारपट्टीवर दाखल झाले. यावेळी भारतीय नौदलाच्या पथकाने त्याची तपासणी केली.
अरबी समुद्रात तीन युद्धनौका तैनातव्यापारी जहाजांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नौदलाने या प्रदेशात आपली INS मुरमुगाव, INS कोची आणि INS कोलकाता, या युद्धनौका तैनात केल्या आहेत. नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांब पल्ल्यासाठी विमान P8I देखील तैनात करण्यात आले आहे. यामुळे जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा बसेल.