नवी दिल्ली - भारतात धार्मिक स्थळांवरून वाद आणि हल्ले वाढत चालले आहेत. गेल्या वर्षभरात भारतात अल्पसंख्यांकांवर धार्मिक हल्ले झाले. त्यात हत्या, धमकावणे आणि दहशत निर्माण करणे यांचा समावेश आहे असा रिपोर्ट अमेरिकन संस्थेने प्रकाशित केल्यानं चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्रता रिपोर्ट २०२१ प्रकाशित केला. त्यात भारताबद्दल हा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेकडून जारी केलेला रिपोर्ट आणि त्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्या प्रतिक्रियेवर अनेक जण भाष्य करत आहेत. त्यात इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिलचाही समावेश आहे. IAMC नं म्हटलंय की, भारतात धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन, मुस्लीम आणि ईसाई अल्पसंख्यांक समुदायावार नियोजित हल्ले पाहता त्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्रता रिपोर्ट २०२१ मध्ये काय लिहिलंय?भारताबाबत उल्लेख करताना IRF 2021 मध्ये लिहिलंय की, भारतात धार्मिक अल्पसंख्याक समुदायावर हल्ले होत आहेत. ज्यात हत्या, मारहाण आणि दहशत पसरवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. त्यात गोहत्या अथवा बीफ व्यापाराचे आरोप करत हिंदू इतर लोकांवर हल्ले केले जात असल्याचं सांगितले आहे. तसेच भारतात सर्व राज्यात धर्मांतरण विरोधी कायद्याचा वापर करून अनेकांना अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, पोलिसांनी हिंदूंविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली आहे. मागील वर्षी त्रिपुरा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरात मुस्लीम लिचिंग घटनांचा उल्लेख झाला आहे. CAA आणि NRC विरोधात प्रदर्शन आणि दिल्ली दंगलीचा उल्लेख रिपोर्टमध्ये आहे. दिल्ली कोर्टाने दंगलीत अटक केलेल्यांपैकी काही जणांना निर्दोष मुक्त केले आहे. एका हिंदूला दोषी ठरवलं आहे. अनेक कोर्टाने अपुरा तपास केल्यामुळे दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. या काळात अनेक नेत्यांनी अल्पसंख्याकांविरोधात धार्मिक विधान आणि सोशल मीडियात पोस्ट केल्याचं रिपोर्टमध्ये सांगितले आहे.