भोपाळ : वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांविरोधात मंत्र्याने आघाडी उघडली असून थेट सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिले आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या कमलनाथ सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न दिग्विजय करत असल्याचा आरोप या मंत्र्याने केला आहे. पत्रात त्यांनी दिग्विजय यांच्यावर सर्व सूत्रे आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला आहे. राज्याचे वनमंत्री उमंग सिंघार यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.
सिंघार यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर पडद्यामागून सरकार चालविण्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेक मंत्री त्यांच्याविरोधात दबक्या आवाजात दखल देत असल्याबद्दल बोलत आहेत, असे म्हटले आहे. दिग्विजय यांनी काही दिवसांपूर्वी मंत्र्यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी मंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता. याबाबत सिंघार यांनी सांगितले की, दिग्विजय सिंह पडद्यामागून सरकार चालवत आहेत. हे जगजाहीर आहे. मग त्यांना पत्र लिहायची गरज काय पडली. त्यांना यातून काय दाखवायचे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
मंत्र्यांची चुप्पी दिग्विजय सिंह यांच्या विरोधातील पत्रातील आरोपांवर अन्य मंत्र्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर दुसरीकडे बाला बच्चन, आरिफ अकील, विजयलक्ष्मी साधो, गोविंद सिंह राजपूत, सुखदेव पांसे या मंत्र्यांनी दिग्विजय हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, यामुळे त्यांना कामावर लक्ष ठेवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.