- डाॅ. खुशालचंद बाहेतीचंदीगड : आपल्या वृद्ध आईच्या हक्काच्या घराची विल्हेवाट लावण्यासाठी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड ठोठावला आहे. राजकुमार गोयल यांनी मृत्यूपूर्वी आपल्या स्वत:च्या घराची दोन भागात वाटणी केली. अर्धा हिस्सा मुलाला व अर्धा पत्नीला दिला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुलाने आईकडून तिच्या वाट्याच्या घराचे कुलमुख्त्यार पत्र करून घेतले. या मुख्त्यारपत्राच्या आधारे त्याने आईच्या वाट्यातील घराची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यास आई व मामाने विराेध केला. मुलाने दोघांविरुद्ध पाेलिसांत तक्रारी केल्या. पुढे मुलाने मुख्त्यार पत्राच्या आधारे त्यास मालमत्तेची आपल्या मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. यात आई व मामांना दखल देण्यास मनाई करावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखलकेली. न्या. अरविंदसिंग संगवान यांनी ही याचिका फेटाळताना मुलगा मुख्त्यारपत्र घेतल्यानंतर आईशी प्रामाणिक राहिला नाही. आईने दिलेल्या अधिकाराचा वापर तो वृद्धावस्थेत तिला घराबाहेर काढण्यासाठी करीत आहे हे दु:खद आहे, असे मत व्यक्तकेले. पोलिसांत दिलेली तक्रार आणि याचिका यातून मुलाचा लोभीपणा दिसून येतो, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुलाला एक लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. हे एक लाख रुपये दोन महिन्यांत वसूल करून आईला देण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले.
वृद्ध आईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न, हायकोर्टाकडून मुलाला लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 8:56 AM