इंदौर : देशातील विमानसेवा सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे. पायात हवाई चप्पल घालणाऱ्या व्यक्तीलाही हवाई सफरीची सुविधा मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी केले.
शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही हवाई प्रवासाची सुविधा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितले आहे की, विमान सेवा अशी असायला हवी की, हवाई चप्पल वापरणारी व्यक्तीही हवाई सफर करू शकली पाहिजे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्याची पूर्ण क्षमता भारतात आहे. देशातील हवाई सेवांचा विस्तार केला जात आहे. त्यातून येणाऱ्या दशकात अधिकाधिक सामान्य लोक विमान प्रवास करू शकतील.
ज्योतिरादित्य शिंदे यांचा गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांना नागरी उड्डयन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारपासून मध्य प्रदेशातील माळवा-निमाड भागात तीन दिवशीय ‘जन आशीर्वाद यात्रा’ सुरू केली. गुरुवारी इंदौरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी, बुधवारी त्यांचे इंदौरात आगमन झाले. श्योपूर येथील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणाऱ्या मदत साहित्याच्या ट्रक्सना त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. खाद्य वस्तू व कपड्यांची मदत या ट्रकद्वारे पाठविण्यात आली आहे. इंदौर नगरपालिकेने या मदत साहित्याची व्यवस्था केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
चार वर्षांत विमान सेवेचा व्यापक विस्तारशिंदे यांनी सांगितले की, मागील चार वर्षांत देशांतर्गत नागरी विमान वाहतुकीच्या विस्ताराचा मोठा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत अनेक छोट्या शहरांत नवीन विमानतळ सुरू करण्यात आले आहे. या स्थानांना मोठ्या शहरांशी जोडणाऱ्या मार्गांवर हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे.