अहमदाबाद - पाटीदार समाजाला आरक्षण देण्यावरुन काँग्रेसने सादर केलेला फॉर्म्यूला आपल्याला मान्य असल्याचं पाटीदार नेता हार्दिक पटेलने सांगितलं आहे. अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलने पत्रकारांशी संवाद साधला. 'भाजपाने अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला असून, आमच्या कार्यकर्त्यांना 50 लाखांचं अमिष दाखवलं. आमच्याविरोधात भाजपाने 200 कोटी खर्च केले', असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. 'भाजपा गेल्या दोन दशकापासून राज्यात सत्तेत असून, त्यांच्याविरोधात लढाई लढणं गरजेचं आहे', असंही हार्दिक पटेल बोलला आहे.
हार्दिक पटेलने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन काँग्रेससोबत कोणतीही वाटाघाटी केलेली नाही. पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. पाटीदारांसाठी तिकीट मागितलेलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना 50-50 लाख रुपये देऊन अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे'.
'किमान अडीच वर्ष तरी आपण कोणत्याही राजकीय पक्षासोबत जाणार नसल्याचं', हार्दिक पटेलने स्पष्ट केलं आहे. 'भाजपाने पाटीदार समाजावर अत्याचार केला असल्या कारणाने आपण त्यांच्याविरोधात लढणार असल्याचं', हार्दिक पटेलने सांगितलं आहे. 'आपण काँग्रेसला जाहीर समर्थन देत नसलो, तरी आपण भाजपाविरोधात लढत आहोत म्हणजे एकअर्थी आपण काँग्रेसला समर्थन देत आहोत', असं हार्दिक पटेलने सांगितलं आहे. निवडणुकीत विजय झाल्यास पाटीदार समाजाला योग्य दर्जा जाईल असं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे.
गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना असेल असं म्हटलं जात आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे. राज्यात गेल्या दोन दशकांपासून भाजपाचं सरकार आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्तावर लढवल्या होत्या. तिन्ही वेळा भाजपाने बहुमताने सरकार स्थापन केलं होतं. 2014 रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. 2012 मध्ये भाजपाला 116 जागा मिळाल्या होत्या.