भोपाळ - देशातील अनेक राज्यात ईडीकडून धाडसत्राची मोहीम सुरू असून गेल्या काही दिवसांता महाराष्ट्रातील बड्या नेत्यांवरही ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजीमंत्री एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे, सर्वत्र ईडीची चर्चा सुरू असताना आता, आयटी विभागानेही कारवाईचं पाऊल टाकलं आहे. दैनिक भास्कर वृत्तसमुहाच्या मध्य प्रदेशातील कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्यावरुन, दिग्गज नेत्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
करचोरी प्रकरणी आयकर विभागाने भारत समाचार आणि दैनिक भास्कर समुहाच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. भास्कर समुहाच्या भोपाळ, अहमदाबाद, जयपूरसह इतर विविध शहरांत ही रेड टाकण्यात आली आहे. तर, दुसरीकडे भारत समाचारचे प्रमोटर्स आणि एडिटर इन चीफच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. हिंदी मीडियाच्या विविध राज्यांतील कार्यालयात ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या कारवाईवरुन शंका व्यक्त केली आहे. दैनिक भास्कर समुहाने कोरोना काळात ग्राऊंड लेव्हलवर काम केलं होतं. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून पेगाससच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांकडून सरकारला धारेवर धरलं जात आहे, याच दरम्यान ही कारवाई होत असल्याची आठवण सिंह यांनी करुन दिली. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.
पत्रकारिता आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर केलेला भ्याड हल्ला म्हणजे लोकशाहीव दबाव टाकण्याचा आणखी एक प्रयत्न आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच, दैनिक भास्करने नरेंद्र मोदींच्या कोविड काळातील कार्याचं निर्भिडपणे वार्तांकन केले होतं, तसेच कोविड महामारीत देशातील विदारक परिस्थिती जनतेसमोर मांडली होती, असेही त्यांनी सांगितलं. तसेच, या कारवाईचा आणि सत्याचा आवाज दाबण्याचा मी निषेध करते, असेही ममता यांनी म्हटलं आहे.