देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:32 PM2023-03-29T12:32:30+5:302023-03-29T12:33:10+5:30
अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले.
नवी दिल्ली - देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षांची ताकद प्रचंड आहे. सत्ताधाऱ्यांना हा देश गुलाम करून आम्हाला बंधनात पकडायचं आहे. ही बंधने तोडण्याची वेळ आलीय. दिल्लीत काँग्रेस पक्षाने जो मोर्चा काढला, महिला खासदार, महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन दिल्ली पोलिसांनी केले. ही हुकुमशाही आणि गुलामगिरी लादण्याचा हा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशात विरोधकांचा आवाज दाबण्याची, आंदोलन होऊच द्यायची नाहीत हे ठरवलेले आहे. निवडणूकसुद्धा हे भ्रष्टमार्गाने जिंकले का असा प्रश्न निर्माण होतोय. देशातील जनता रस्त्यावर उतरताना दिसतेय त्यावरून यांना लोकांनी मतदान केले नाही हे स्पष्ट होते. शरद पवारांनी EVM बाबत बैठक घेऊन प्रश्न उभे केले. त्याबाबत आम्ही पुढे जाऊ असं त्यांनी सांगितले.
अदानींचे २० हजार कोटी कुणाचे?
बदल्याचं राजकारण सुरूच आहे. बदला कुणाशी आणि का घेतायेत, तसेच त्यासाठी देश लुटणाऱ्या गौतम अदानींच्या मागे का उभे आहेत याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत केलेले भाषण पुरेसे बोलके आहे. अदानी हा चेहरा आहे त्यांचे पैसे मोदींचे आहेत याचा तपास व्हायला हवा. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच अदानींचा उदय झाला. हजारो-शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुरू असताना आजही मोदी सर्व विषयावर बोलतात. विरोधकांशी संघर्ष करतात पण यावर बोलत नाहीत. अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले.
सावरकर हा विषय संपला
सावरकर विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शरद पवारांनी एक भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झालीय. भविष्यात काय होतंय ते पाहा असं सांगत खासदार संजय राऊतांनी सावरकर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.