उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील मडियाहू परिसरात भाजपा नेत्याच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलगी शाळेतून परतत असताना अपहरणकर्त्यांनी तिचा पाठलाग करून तुझ्या बाबांनी तुला बोलवलं असल्याचं सांगितलं. यावर मुलीने नकार दिला आणि ती घरी आली. तिने घरी हा प्रकार सांगितला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भाजपा नेते विमलेश कुमार यांची मुलगी शाळेतून घरी परतत असताना अपहरणकर्त्यांनी जवळपास दहा मिनिटं मुलीचा पाठलाग केला. मुलीचा पाठलाग करत आरोपी तिच्याजवळ पोहोचले. याच दरम्यान एका व्यक्तीने बेटा माझ्यासोबत चल, तुझ्या वडिलांनी बोलवलं आहे, असं सांगितलं, मात्र मुलीने नकार दिला.
मुलगी पाचवीत शिकते. तिची शाळा आणि घर हे अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. ती घरून एकटीच शाळेत येते. गेल्या मंगळवारी शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली. याच दरम्यान, दोन अनोळखी लोक बाईकवरून तिच्याजवळ आले आणि तुझ्या बाबांनी तुला बोलवलं आहे असं सांगून मुलीला आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करू लागले.
मुलीने त्यांना सांगितलं की, तिच्या आईने तिला कोणासोबतही जाण्यास आणि काहीही खाण्यास किंवा पिण्यास मनाई केली होती. यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करत राहिले, मात्र गर्दीच्या ठिकाणी पोहोचल्यावर आरोपी तेथून निघून गेले. मुलीने घरी हा प्रकार सांगितला आणि वडिलांना तुम्ही मला का बोलावलं होतं असा प्रश्न विचारला. त्यावर वडिलांनी आपण कोणालाही पाठवलं नसल्याचं सांगितलं. पण या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
यानंतर भाजपाचे प्रदेश मंत्री विमलेश कुमार यांना संशय आला आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यामध्ये दोन बाईकवर असलेले लोक मुलीचा पाठलाग करताना दिसले. विमलेश यांनी मडियाहू पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
डीसीपी अभिजीत आर शंकर यांनी सांगितलं की, विमलेश कुमार यांनी मडियाहू पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार त्यांची मुलगी १६ जुलै रोजी शाळेतून परतत असताना बाईकवर दोन जण आले आणि म्हणाले की, तुझे बाबा तुला बोलवत आहेत. त्यामुळे तू आमच्यासोबत चल. मुलीने नकार दिला आणि घरी गेली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.