अयोध्या: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापणा होणार आहे. देशासह जगभरातील रामभक्तांमध्ये याबाबत प्रचंड उत्साह आहे. अयोध्येतही हळुहळू गर्दी वाढत आहे. या दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे काही कार्यकर्ते राम मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना मोठा वाद झाला. काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे यूपी प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ अयोध्या दौऱ्यावर आले आहे. सोमवारी ही मंडळी हनुमानगढीमध्ये दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थांबली. यावेळी काही लोकांनी एका कार्यकर्त्याच्या हातातून काँग्रेसचा झेंडा हिसकावून घेतला. यानंतर दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. यानंतर यूपी पोलिस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले.
काँग्रेसने निमंत्रण नाकारलेदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले आहे. काँग्रेस नेतृत्वाने याला भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हटले असून, यावरुन सातत्याने टीकाही करत आहेत.