ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:39 PM2020-03-14T12:39:24+5:302020-03-14T12:40:16+5:30
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली.
नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. शहरातील कमला पार्क परिसरात ज्योतिरादित्य यांची गाडी रोखून दगडफेक केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर दगडफेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यासाठी भाजपचे स्थनिक नेते राजेंद्र गुप्ता, श्यामला पोलिस चौकीत दाखल झाले होते. यावर पोलिस अधिकारी बी.पी. सिंह यांनी सांगितले की, शिंदे यांना सांयकाळी सात वाजता काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजप नेत्यांकडून दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र दगडफेक झाली नाही, असं त्यांनी सांगितले.
चौहान म्हणाले की, शिंदे यांच्या गाडी चालकाने कशीबशी गाडी तेथून काढली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गाडीवर हल्ला होऊ शकतो, तर सर्वसामान्यांच काय, असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला. राज्याची स्थिती अत्यंत बिकट असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याची त्यांनी केली.