व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : भाजपविरोधी संभाव्य आघाडी उभी करण्यात सध्या तरी अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचे तृणमूल काँग्रेसने ठरविले आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला टक्कर देणारा प्रमुख पक्ष म्हणून समाजवादी पार्टी स्वत:ला सादर करत आहे.
दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा आप पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आकार घेताना दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिगर भाजप पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांत हे शक्य दिसत नसल्याने ते आता वेगळ्या रणनीतीवर काम करत आहेत.
कोणत्या राज्यात काय हालचाली?गुजरातमध्ये पुढील वर्षीच्या अखेरीस निवडणुका होत आहेत. आपने या राज्यात आपले निवडणूक कार्यालय सुरूही केले आहे. युवा नेते जिग्नेश मेवानी, कन्हय्या कुमार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.राहुल गांधी पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असताना काँग्रेससोबत आघाडीचा लाभ मिळण्याची शक्यता समाजवादी पार्टीला वाटत नाही. उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.