नवी दिल्ली : केंद्र सरकार आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आमची एकजूट अभेद्य असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे स्पष्ट करत आक्रमक शेतकऱ्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून शेतीविषयक कायदे रद्द करावेत, अशी आग्रही मागणी केली आहे.
विविध राज्यांतून आलेले शेतकरी गेल्या सात दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या संघटनांचे नेते व केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या चार फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी संघ व भाजप प्रणीत किसान संघटनांची मदत घेतली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र, कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्ली सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
अमित शहा-अमरिंदर सिंग यांच्यात आज चर्चाआंदोलकांशी केंद्र सरकार गुरुवारी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात सकाळी ९.३० वाजता चर्चा होणार आहे.