नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील जातीआधारित आरक्षणाला आव्हान देणारे आपले आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रयत्न चालविलेला आहे, असा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.आपण आंदोलन सुरू केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी लगेच आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य रा. स्व. संघ आरक्षणाबाबत निराश झाल्याचे द्योतक आहे. आरक्षण रद्द करण्याबद्दलचे आपले म्हणणे कुणीही ऐकत नाही, हे संघाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे दुसरा कुणी आरक्षणाबाबत बोलत असेल तर त्यात सामील झाले पाहिजे, असे संघाला वाटते, असे पटेल म्हणाले.भागवत हे आम्ही सुरू केलेल्या धावत्या रेल्वेवर उडी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्राह्मण नेहमी हेच करीत असतात. रा. स्व. संघाने जातीच्या आधारावर हिंदूंचे विभाजन केले आहे आणि त्यासाठी मुस्लिमांना दोष देत आहेत, अशी टीकाही पटेल यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा संघाचा प्रयत्न
By admin | Published: October 02, 2015 11:40 PM