पालनपूर : १७ वर्षांच्या मुस्लीम मुलीची गुजरातेत वधू म्हणून ८० हजार रुपयांत विक्री करण्याचा डाव उधळण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पीडित मुलगी महाराष्ट्रातील असून, आरोपींनी नोकरीच्या बहाण्याने तिची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी ठाणे जिल्ह्यातील कल्याणची रहिवासी आहे. राजू प्रजापती याने चांगल्या ‘कॅटरिंग सर्व्हिस फर्म’मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला अहमदाबाद येथे आणले होते. काही दिवस तेथे ठेवल्यानंतर प्रजापतीची साथीदार महिला तिला अंबाजी येथे घेऊन गेली. तिची विक्री करण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी मोगजी चौधरी याच्या व्यक्तीशी संपर्क साधला. बदरपूर या गावचा रहिवासी असलेल्या चौधरीकडे पंचक्रोशीतील कोणाला वधू हवी आहे, याची माहिती असते. भारत सेनमा यांना त्यांच्या मुलासाठी वधू हवी होती. चौधरी याने त्यांच्याशी संपर्क साधून विवाहासाठी मुलगी उपलब्ध असल्याचे कळविले. वाटाघाटी होऊन ८० हजार रुपयांत मुलीच्या खरेदीचा व्यवहार ठरला. तथापि, मुलीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने तिच्या ओळखीच्या स्थानिक मुलीशी संपर्क साधला. या मुलीने वडनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी चौधरी आणि सेनमा या दोघांच्या मुसक्या आवळल्या. (वृत्तसंस्था)महिलेचा शोध सुरूआरोपींनी मुलीची सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचे बनावट करारपत्र तयार केले होते. त्यांनी तिची जवळपास विक्री केली होती. मात्र, आम्ही त्यांना पकडण्यात यशस्वी झालो. आम्ही आता प्रजापती आणि त्याच्यासोबतच्या महिलेचा शोध घेत आहोत, असे मेहसानाचे पोलीस अधीक्षक चैतन्य मंडलिक यांनी सांगितले.
कल्याणच्या मुलीच्या विक्रीचा प्रयत्न फसला
By admin | Published: August 25, 2016 4:49 AM