विरोधकांच्या ऐक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ठरला अयशस्वी; उपराष्ट्रपती निवडणुकीत मतभेद उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:58 AM2022-08-08T07:58:43+5:302022-08-08T07:58:47+5:30
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी महिला असल्यामुळे अनेक पक्षांनी मते दिली.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विरोधी पक्षांचे ऐक्य केवळ कागदावरच राहिले. विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव होणार यात कोणालाही संशय नव्हता; परंतु राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर विरोधकांनी ऐक्य दाखवण्याची एक संधी गमावली, एवढे मात्र खरे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी महिला असल्यामुळे अनेक पक्षांनी मते दिली; परंतु जगदीप धनखड यांना एनडीएच्या खासदारांबरोबरच बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेससारख्या बिगर एनडीए खासदारांचीही मते मिळाली. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल असले आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या भलेही ३६ असली तरी ममता बॅनर्जी यांचे खासदार उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहिले. पार्थ चॅटर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्याविरुद्ध केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे हे खासदार निवडणुकीपासून दूर राहिल्याचे सांगितले जात आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाने मुर्मु यांना मते दिली होती; परंतु यावेळी जेएमएम खासदारांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मते दिली असली तरी त्यांना राष्ट्रपतिपदाचे विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. द्रौपदी मुर्मु यांना ५४० मते मिळाली होती, तर धनखड यांना ५२८ मते मिळाली. याचप्रमाणे यशवंत सिन्हा यांना २०८, तर अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली.
नाराजी समोर आली
उपराष्ट्रपतिपदाचा निकाल जाहीर झाल्यावर विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची नाराजी समोर आली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ही निवडणूक विरोधकांना एकत्र काम करण्याची, जुन्या गोष्टी सोडून एकमेकांचा विश्वास संपादन करण्याची संधी होती. दुर्दैवाने काही विरोधी पक्षांनी विरोधकांच्या एकजुटीच्या विचाराची गाडी रुळावरून उतरविण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा देण्याचा पर्याय निवडला. असे करून या पक्षांनी व नेत्यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला.