प्रतिनिधी, घुमान (संत नामदेवनगरी) घुमान संमेलनाला महाराष्ट्रातील नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलावंतांनी हजेरी लावली, मात्र बोटावर मोजण्याइतक्याच सहित्यिकांनी हजेरी लावली. महाराष्ट्रातील संमेलनात नियमित हजेरी लावणाऱ्या साहित्यिकांनीही पाठ फिरवल्याचे दिसून आले.संमेलनाची घोषणा झाल्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. घुमानमध्ये मराठी माणूस नसताना तेथे साहित्य संमेलन घ्यायचेच कशाला, अशी उठाठेव करायचीच कशाला, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून उमटला होता. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर या नावाजलेल्या कवींशिवाय संमेलनाला महाराष्ट्रातून कुणी आलेच नाहीत. राजन खान पहिल्यांदाच संमेलनात सहभागी झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम यांनीही संमेलनास हजेरी लावली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष फैय्याज यांनी संमेलनाला लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाने हजेरी लावण्याची ही पहिलीच घटना. साहित्य क्षेत्राने सन्मान दिल्याबद्दल फैय्याज यांनी आयोजकांचे कौतूक केले. उपेंद्र भट, शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, स्मिता तांबे, सावनी रवींद्र, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी यांची हजेरी लक्षवेधी ठरली.
कलावंतांची हजेरी, साहित्यिकांची पाठ
By admin | Published: April 06, 2015 2:55 AM