नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट असून, आतापर्यंत बिहार व उत्तर प्रदेशात ५0 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अधिक मतदान व्हावे व पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य गेल्या वेळपेक्षा अधिक असावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.
या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, व भाजपचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सभांचा धडाका लावला आहे. सॅम पित्रोडा यांच्या शीखविरोधी दंगलींबाबत विधानाचा पंजाबमध्ये फटका बसू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्याचमुळे राहुल गांधी यांनी सोमवारीही पित्रोडा यांच्या विधानाचा जाहीरपणे निषेध केला.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील दलित महिलेवरील बलात्काराचे प्रकरण हा पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. या प्रश्नावरून मायावती यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे मोदी म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांच्या आघाडीचा सामना करणे शक्य नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने तिथे त्या पक्षांवरच मोदी हल्ला चढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोदी व अमित शहा आणखी सभा घेणार असून, त्यामुळे तिथे भाजप व तृणमूल यांच्यातील कटुता वाढेल, असे दिसते.
या राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदानया टप्प्यात उत्तर प्रदेश (१३ जागा), बिहार (८), पश्चिम बंगाल (९), मध्य प्रदेश (८), झारखंड (३), पंजाब (१३) हिमाचल प्रदेश (४) व चंदीगड (१) येथे आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशातील सर्व जागांवर त्या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. बिहारमध्ये लढाई भाजप व राष्ट्रीय जनता दल यांच्यातच दिसत आहे.