तिरुअनंतपुरम- केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या केरळ पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणा-या भागावर नजर ठेवून आहे. केरळमधल्या या मुसळधार पावसानं आतापर्यंत 324 जणांचा बळी घेतला आहे, तर दोन लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत.
केरळच्या मुख्यमंत्र्यांचं मदतीचं आवाहनकेरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे. दरम्यान, दिल्ली आणि पंजाब सरकारने केरळला प्रत्येकी 10 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देशकुन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यांत भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं मल्लपेरियार धरणाची देखरेख करणा-या अधिका-यांना सूचना केली होती की, धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा. तसेच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्यानं तोडगा काढण्याचे सरकारला सांगितले आहे.