नवी दिल्ली : मुघल शासक औरंगजेब सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने 'औरंगाबाद' जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले. आता नवी दिल्ली नगरपालिका परिषदने देखील औरंगजेबाच्या नावाने सुरू असलेल्या रोडचे नाव बदलले आहे. परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटियन्स दिल्लीतील औरंगजेब लेनचे नाव डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असे करण्यात आले आहे.
नवी दिल्ली नगरपालिका परिषदेच्या (NDMC) अधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीत या रस्त्याचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खरं तर NDMC ने ऑगस्ट २०१५ मध्ये औरंगजेब लेनचे डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
नगरपालिकेच्या क्षेत्रातील 'औरंगजेब लेन' चे कलम २३१ च्या उपकलम (१) च्या खंड (अ) नुसार 'डॉ. एपीजे. 'अब्दुल कलाम लेन' या नावाच्या विचारासाठी परिषदेसमोर एक अजेंडा ठेवण्यात आला होता. ज्याला अखेर मान्यता देण्यात आली आहे.
"औरंगजेब लेनचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असे ठेवण्यात आले आहे. औरंगजेबने भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून औरंगजेबाच्या नावाने कोणताही रस्ता असू नये", असे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सांगितले.