नवी दिल्ली : प्रथिनाधारित कोरोना लस विकसित करून तिचे उत्पादन करण्याबाबत भारताच्या अरोबिंदो फार्माने अमेरिकेच्या कोव्हॅक्स या कंपनीशी करार केला आहे.यासंदर्भात अरोबिंदो फार्मा या कंपनीने म्हटले आहे की, कोव्हॅक्स कंपनीची यूबी-६१२ ही पहिली प्रथिनाधारित कोरोना लस आहे. भारत व युनिसेफ यांच्यासाठी ही लस विकसित करण्याकामी अरबिंदो फार्मा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही लस विकसित झाल्यास तिच्या वितरण, विक्रीसाठी महत्त्वाच्या देशांतील हक्कही कोव्हॅक्सने अरबिंदो फार्माला देऊ केले आहेत. या लसीचे उत्पादन अरोबिंदो फार्माच्या हैदराबादमधील कंपनीत करण्यात येईल. सध्या अरबिंदो फार्माच्या कंपनीत कोरोना लसीच्या २२ कोटी डोसचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, जून महिन्यापर्यंत ४८ कोटी इतके डोस बनविण्याचे लक्ष्य या कंपनीने ठेवले आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अरोबिंदो फार्माने पावले उचलली आहेत. विविध प्रकारच्या कोरोना लसी भारतात बनल्यामुळे लसींचे उत्तम पर्याय येत्या काही महिन्यांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
प्रथिनाधारित कोरोना लस निर्मितीसाठी अरोबिंदो फार्माचा कोव्हॅक्सशी करार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 2:09 AM