उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी सायंकाळी सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या आतच अडकून रहावे लागले होते. अखेर ऑगर मशीनने अर्धवट सोडलेले खोदाईचे काम रॅट मायनिंगच्या कामगारांनी पूर्ण केले आणि या सर्वांची सुटका झाली.
उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यातून ४१ मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी भारतीय खाद्यपदार्थांची प्रशंसा केली आहे. डिस्क यांनी भारतातील लोकांना सांगितले, तुमचे जेवण उत्कृष्ट आहे. भारतीय शाकाहारी अन्न अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे. तसेच मला घरी जावसं वाटत नाही, असंही डिक्स यांनी म्हटलं आहे.
बोगद्याच्या बाहेर तैनात असलेल्या बचाव कर्मचार्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी परदेशातून आलेले बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनाही भारतीय शाकाहारी पदार्थ खायला मिळाले आणि ते शाकाहारी जेवणाचे चाहते झाले. अरनॉल्ड डिक्स यांनीही बोगद्याच्या तोंडावर बांधलेल्या तात्पुरत्या मंदिरात बाबा बौखनाग देवतेची पूजा केली. संपूर्ण बचाव कार्यादरम्यान, तज्ञ डिक्स नियमितपणे बाबांच्या दारात डोके टेकवताना दिसत होते. म्हणजे विज्ञानाबरोबरच परदेशी प्राध्यापकाची धर्मावरही श्रद्धा असल्याचे पाहायला मिळाले.
जगाने पाहिले...जबरदस्त नियोजन-
कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठी बोगद्याच्या आत आठ खाटांचे तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात आले होते. सुटका करण्यात आलेल्या कामगारांसाठी सिल्क्यरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या ४१ बेडसह एक विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. डॉक्टरही सज्ज होते. गरज पडल्यास मजुरांना अधिक प्रगत रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केलेली होती. घटनास्थळी प्राथमिक तपासणीनंतर सुटका झालेल्या कामगारांना सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोगद्याच्या तोंडावर रांगेत उभ्या होत्या. रुग्णवाहिकांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी मातीचा थर पुन्हा टाकण्यात आला. बोगद्याच्या आत स्ट्रेचर नेले जात होते.
१२ रॅट-माइनर्स आत गेले अन् डोंगर पराभूत झाला
शक्तिशाली ऑगर ड्रिलिंग मशीन शुक्रवारी ढिगाऱ्यात अडकल्याने अधिकाऱ्यांनी शेवटच्या १० मीटरचा ढिगारा खोदण्यासाठी हाताने बोरिंग करण्याची योजना आखली होती. मर्यादित जागेत हाताने पकडलेल्या साधनांचा वापर करून ड्रिलिंगचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी १२ रॅट-माइनर्स बोलावण्यात आले होते. त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांचे कौशल्य आणि अनुभव कामी आला, त्यांनी २४ तासांपेक्षा कमी वेळेत १० मीटर खोदून एक अभूतपूर्व काम केले. रॅट-होल खाणकाम बेकायदेशीर असू शकते; परंतु या तज्ज्ञांची प्रतिभा आणि अनुभव यांचा योग्य वापर येथे केला गेला, असे हसनैन यांनी सांगितले. ते दिल्ली, झाशी आणि देशाच्या इतर भागातून आले होते.