नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबोट हे माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची उद्या, गुरुवारी भेट घेणार आहेत. या भेटीने त्यांच्या भारत दौ:याची सुरुवात होईल.
अॅबोट हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलािस्ट आणि ब्रेट ली यांच्यासह भारत भेटीवर येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट संबंधाविषयी ते चर्चा करतील, अशी माहिती परराष्ट्र खात्याचे संयुक्त सचिव संजय भट्टाचार्य यांनी दिली. भारताच्या आर्थिक राजधानीतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे प्रख्यात क्रिकेट खेळाडूंसमवेत त्यांचा वार्तालापाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. याच दौ:यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्रीडाविषयक सामंजस्य करारावर उभयपक्षी सह्या करणार आहेत.
भट्टाचार्य म्हणाले की, येत्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार प्रयत्न करीत आहे. महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्या स्मरणार्थ डॉन ब्रॅडमन फाउंडेशन आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्या वतीने पुढील वर्षी भारतामध्ये ‘डॉन ब्रॅडमन मेमोराबिलीया’ हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ब्रॅडमन यांनी पहिल्या कसोटीत फलंदाजीसाठी वापरलेली बॅट, तसेच त्या महान खेळाडूच्या वापरातील इतर वस्तू ठेवण्यात येणार आहेत.(वृत्तसंस्था)