नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांना जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी या बैठकीत 54व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांची निवड करण्यात आली.
अमिताभ घोष यांना इंग्रजी साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी शॅडो लाइन्स या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याचबरोबर, केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
अमिताभ घोष यांचा 11 जुलै 1956 रोजी कोलकाता येथे जन्म झाला. दिल्लीच्या सेंट स्टीफन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून घोष यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. 'द सर्कल ऑफ रीजन' ही त्यांची पहिली कांदबरी होती. या कादंबरीने अमिताभ घोष यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.