'मोदींना बोलवा तरच लस घेईन', एका व्यक्तीची अजब मागणी ऐकून अधिकारीही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 05:12 PM2021-09-26T17:12:42+5:302021-09-26T17:13:43+5:30
Corona Vaccination : कोरोनाची लस घेण्यास इच्छुक नसलेल्या या व्यक्तीने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले तर कोरोना लसीचा पहिला डोस घेईन.
नवी दिल्ली : लसीकरणाबाबत एक वेगळीच घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून समोर आले आहे. दरम्यान, या व्यक्तीने लसीकरणासाठी अशी मागणी धरून लावली आहे की, ती पूर्ण करणे अधिकाऱ्यांनाही शक्य नाही. कोरोनाची लस घेण्यास इच्छुक नसलेल्या या व्यक्तीने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले तर कोरोना लसीचा पहिला डोस घेईन. तसेच, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, लस घेण्यासाठी पुन्हा एकदा त्या व्यक्तीचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण धार जिल्ह्यातील दाही ब्लॉकमधील असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी आरोग्य विभागाची टीम किकरवास नावाच्या आदिवासी गावात पोहोचली आणि येथे अनेक लोकांना लस दिली. पण, जेव्हा या व्यक्तीचा नंबर आला, तेव्हा त्याने लस घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही तो व्यक्ती तयार होत नव्हता. त्याच्या या नकाराला वैतागून अधिकाऱ्यांनी विचारलं की, कुणाला बोलवू म्हणजे तू लस घेशील? यावर त्या व्यक्तीने आधी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावले पाहिजे. यानंतर अधिकाऱ्यांनी विचारले की, जर दंडाधिकाऱ्यांना फोन केल्यावर तुम्ही लस घ्यायला तयार व्हाल का? यावर ती व्यक्ती म्हणते, दंडाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून बोलविण्यास सांगा. फक्त मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच कोरोनाची लस घेईन.
गावात फक्त दोनच व्यक्तीनी लस घेतली नाही
आरोग्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, गावात केवळ दोनच लोक आहेत ज्यांनी लस घेतली नाही. यामध्ये हा व्यक्ती आणि त्याची पत्नी या दोघांचा समावेश आहे. आरोग्य अधिकारी दुबे यांनी सांगितले की, आम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधू आणि त्याला लस घेण्यास पुन्हा पटवून देऊ. दरम्यान, सर्व पात्र लोकांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मेगा लसीकरण मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.