रुबी प्रजापतीने NEET UG मध्ये ७२० पैकी ६३५ गुण मिळवून डॉक्टर होण्याचं तिच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. परिस्थितीचा सामना करत, संघर्ष करत तिने हे घवघवीत यश संपादन केलं आहे. रुबीने सांगितलं की, "मी गुजरातमधील एका गावात लहानाची मोठी झाले, जिथे शिक्षणासाठी खूप कमी सुविधा होत्या. मी सरकारी शाळेत शिकले आणि नेहमीच चांगली विद्यार्थिनी होते. जेव्हा मी डॉक्टर व्हायचे ठरवले तेव्हा फी हे सर्वात मोठं आव्हान होतं."
"माझ्या वडिलांकडे तेवढे पैसे नसल्यामुळे माझ्या काकांनी एक वर्षासाठी माझ्या कोचिंगसाठी पैसे दिले. मी हार मानली नाही. पैसे जमवण्यासाठी मी ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. मी YouTube वर अनेक व्हि़डीओ पाहिले आहेत, ज्यामुळे मला प्रेरणा मिळाली. कठीण परिस्थिती आली पण मी न खचता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि सर्व संकटांना सामोरी गेली."
"माझे वडील रिक्षाचालक आहेत, त्यामुळे ते मला आर्थिकदृष्ट्या पूर्ण सहकार्य करू शकले नाहीत. माझ्या फीसाठी माझ्या काकांनी पाठिंबा दिला. आर्थिक अडचणी असूनही माझ्या वडिलांनी मला माझ्या अभ्यासात साथ दिली. कधीही शिक्षणासाठी नकार दिला नाही. माझ्या आईच्या सकारात्मक विचाराने मला नैराश्यातून बाहेर काढलं आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मी सर्व शक्ती तिच्याकडून घेतली आहे."
"मला एक मोठा भाऊ आहे ज्याला बोलायला थोडी अडचण येते आणि मला एक लहान भाऊ होता, पण त्याचं नऊ वर्षांपूर्वीच निधन झालं. लोकांना मदत करणे हे माझं हे शिकण्यामागचं मुख्य कारण होतं. मी माझा भाऊ गमावला आहे ज्याचं ९ वर्षापूर्वी निधन झालं. त्यामुळेच मी असं करायचं ठरवलं. इतरांना मदत केल्याने मला प्रेरणा मिळते" असं रुबी प्रजापतीने म्हटलं आहे.