नवी दिल्ली - गुगलने आपल्या गुगल मॅप या अॅपमध्ये एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (17 डिसेंबर) गुगलने ही घोषणा केली आहे. दिल्लीकरांना आता या फीचरमुळे टॅक्सी, कॅब आणि ओलाप्रमाणे 'पब्लिक ट्रान्सपोर्ट' मोडमध्ये गुगल मॅप अॅपवर ऑटो-रिक्षाचाही पर्याय दिसणार आहे.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गुगल मॅप अॅपवरून प्रवाशांना कुठपर्यंत जायचंय या माहितीसोबतच मार्ग (रुट) आणि ऑटो-रिक्षाचे भाडे किती होणार आहे?, हे समजणार आहे. या नवीन अॅप फीचरमुळे दिल्लीकरांचा प्रवास आणखी सोयीचा आणि सुखकारक होईल, असे गुगलने म्हटले आहे. गुगलचे हे नवीन फीचर गुगल मॅपमधील पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कॅबवर पाहता येवू शकणार आहे. तसेच दिल्लीतील तज्ज्ञ आणि दिल्ली ट्रॅफीक पोलिसांकडून रस्त्यांची सर्व माहिती मिळवून हे फीचर तयार करण्यात आल्याचे गुगलने सांगितले आहे.
गुगल मॅपचे प्रॉडक्ट मॅनेजर विशाल दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीत आजच्या घडीला अनोळखी रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांकडून गाडी चालक जास्तीच्या पैशांची मागणी करत असतात. दिल्लीत नवीन आलेल्या लोकांना बऱ्याचदा मार्ग माहिती नसतो त्यामुळे गुगल मॅपच्या या नवीन अॅपची त्यांना मदत होणार आहे. या अॅपमधून प्रवाशांना ऑटो-रिक्षाचे भाडे किती होईल, याचा अंदाज येईल आणि रिक्षाने जायचे की नाही, हेही ते ठरवू शकतील. सध्या ही सेवा केवळ दिल्लीत असणार आहे. देशातील अन्य शहरात ही सेवा सुरू होणार आहे की नाही, याबाबत गुगल मॅपने अध्याप अधिकृत असे काही सांगितले नाही. या सेवेचा वापर करण्यासाठी मोबाईलमध्ये गुगल मॅपला अपडेट करावे लागणार आहे.