नवी दिल्ली: भारतात सूर्यास्तानंतर शवविच्छेदन(PostMortem) करण्याची परवानगी नव्हती. पण, आता आजपासून देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ही महत्वाची माहिती दिली. या निर्णयानंतर आता ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे.
नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद केले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टेम प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही पोस्टमॉर्टेम करता येईल. या निर्णयात आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोणत्याही प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळीही पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.
कोणत्या मृतदेहांचे शवविच्छेदन रात्री होणार नाही ?
रात्री कोणत्या मृतदेहांचे शवविच्छेदन होणार नाही, याचीही माहिती केंद्र सरकारने दिली आहे. निकालानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याशिवाय, खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह या श्रेणींमध्ये रात्रीच्या वेळी पोस्टमॉर्टम केले जाणार नाही. सरकारने या नवीन निर्णयाबाबत सर्व संबंधित मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारांना सूचित केले आहे.