Avadh Ojha Net Worth: यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे कोचिंग शिक्षक अवध ओझा आता राजकीय नेते बनले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृ्त्वाखालील आम आदमी पार्टीत अवध ओझा यांनी सोमवारी प्रवेश केला. दिल्लीच्या राजकारणात पाऊल ठेवलेले अवध ओझा हे ओधा सर म्हणून प्रसिद्ध आहेत.
अवध ओझा हे कोचिंग शिक्षक असले तरी त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. कोचिंगच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईबरोबर त्यांना यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही भरपूर पैसे येतात.
किती आहे अवध ओझा यांची संपत्ती?
उत्तर प्रदेशातील गोंडाचे असलेले अवध ओझा हे ओझा सर म्हणून जास्त ओळखले जातात. अवध ओझा यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पण, यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी यूपीएससी कोचिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांची कमाई वाढत गेली. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार अवध ओझा यांच्याकडे ११ कोटी संपत्ती आहे.
अवध ओझांच्या नेटवर्थमध्ये सर्वाधिक हिस्सा कोचिंग सेंटर्समधून येणाऱ्या उत्पन्नाचा आहे. ओझा यांना कोचिंग व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उत्पन्न येते. ते मोटिवेशनल स्पीकर असून, एखाद्या सेलिब्रिटींसारखे प्रसिद्ध आहेत.
अवध ओझा यांची आई पेशाने वकील होती, तर वडील पोस्टमास्तर होते. अवध ओझा यांचे आयएएस अधिकारी होण्याचे होते. त्यांनी भरपूर अभ्यास केला. प्रयागराजमध्ये त्यांनी तयारी केली. पण, त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर नोकरी न करता वेगळा रस्ता निवडला आणि कोचिंग सुरू केले. २००५ मध्ये त्यांनी दिल्लीतील मुखर्जीनगरमध्ये पहिले कोचिंग सेंटर सुरू केले होते.